सहकारी सोसायट्या व रुग्णालयामध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे – अमिताभ बच्चन

‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविले जात आहे

Newslantern Lifestyle Desk

मुंबई: देशातील सर्वच स्तरातील लोकांनी व स्वच्छता प्रे‍मिंनी सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे ‘स्वच्छ भारत मिशन’ यशस्वी होऊ शकले, या अभियानात ज्या स्वच्छाग्रहींनी सहभाग नोंदविला त्यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असे प्रशंसोद्‌गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे देशातील विविध ठिकाणी निवडक मान्यवर व विद्यार्थ्यांशी संवाद साधून, ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ केला. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधला.

यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, चार वर्षापासून सुरु असलेल्या स्वच्छता अभियानाला देशातील सर्वच स्तरातील लोकांनी पाठिंबा दिला आहे. टाटा ट्रस्टने स्वच्छता अभियानामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यातही टाटा परिवाराचे महत्वाचे योगदान राहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वच्छतेसाठी जनजागृती केली असून फक्त स्वच्छतेसोबतच सामाजिक अभियानामध्ये देखील अमिताभ बच्चन यांचे मोठे योगदान आहे. स्वच्छता अभियानात केलेल्या सहकार्याबद्दल श्री. बच्चन आणि श्री. टाटा यांचे प्रधानमंत्र्यांनी आभार मानले.

यावेळी रतन टाटा म्हणाले, कोणतीही वास्तू उभारण्यासाठी पाया मजबूत असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे स्वच्छता हाच आपल्या देशाचा पाया आहे. प्रधानमंत्र्यांनी स्वच्छतेसाठी जे कार्य केले ते महत्वपूर्ण आणि धाडसी आहे.

यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले, चार वर्षापुर्वीपासुन या अभियानाची सुरूवात झाली. या अभियानाच्या प्रचारात सहभागी होण्याची जबाबदारी प्रधानंत्र्यांनी दिली, याबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे. या अभियानात मी स्वत: वर्सोवा बीच व जे.जे. हॉस्पिटल येथे सहभाग घेतला. सहकारी सोसायट्या व रुग्णालयामध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. यापुढेही मी स्वच्छाग्रही म्हणुन कार्यरत राहील, अशी ग्वाही श्री.बच्चन यांनी दिली.

‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविले जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे झालेल्या या कार्यक्रमास पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, टाटा ट्रस्ट व विविध स्वयंसेवी संस्थाचे स्वच्छाग्रही उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!

Signup to receive latest news in your inbox!

Send this to a friend