रास्त भाव दुकानात 35 रुपये किलो दरानेच तूरडाळ

Newslantern Biz Desk

मुंबई: मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील अधिकृत शिधावटप दुकानात तूरडाळ प्रती किलो 35 रुपये या दरानेच विक्री करण्याबाबत निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. रास्तभाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या तूरडाळींच्या पाकीटांवर 55 रुपये प्रतिकिलो असा दर छापलेला असला तरी या तूरडाळीच्या पाकीटांवर 35 रुपये प्रतिकिलो असे स्टिकर लावून त्याच दराने रास्त भाव दुकानदारांकडून सर्व शिधापत्रिकाधारकांना विक्री करण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून तशा सूचना रास्त भाव दुकानदारांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी दिली आहे.

मुंबई /ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून ई- पॉस मशिनद्वारे धान्य वाटपामध्ये पारदर्शकता आणून कोणताही लाभार्थी अन्नधान्यपासून वंचित राहणार नाही व अन्नधान्याची जादा दराने विक्री केली जाणार नाही. तसेच शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नसांची विक्री केल्यानंतर पावती देण्याबाबत सूचना अधिकृत शिधावाटप दुकानदारांना देण्यात आलेल्या आहेत. जे अधिकृत शिधावाटप दुकानदार या आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील अधिकृत शिधावटप दुकानदाराने तांदूळ, गहु, केरोसीन ई.शिधाजिन्नसांचे ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण करताना शासनाने दिलेल्या निर्देशानुसार वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2003 अन्वये, मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात लाभार्थी निश्चित करुन, शहरी भागातील सध्याचा बीपील शिधापत्रिका व्यतिरिक्त एपीएल (केशरी) शिधापत्रकांमधून कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 59 हजार रुपयांपर्यंत असलेल्या लाभार्थ्यामधून प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांच्या शिधापत्रत्रिकांवर ‘प्राधान्य गटातील लाभार्थी’ असा, शिक्का मारण्यात आलेला असून शिधापत्रिकेतील जेष्ठ महिलेच्या नावासमोर ‘कुटुंबप्रमुख’ असा शिक्का मारण्यात आलेला आहे.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3 रुपये प्रती किलो याप्रमाणे प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ व रुपये 2 प्रती किलो याप्रमाणे प्रति व्यक्ती 3 किलो गहू वितरण करण्यात येत आहेत.

लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याकरिता लाभार्थ्याचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक ही माहिती संकलित करुन संगणकीकरण करण्यात आलेले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत एप्रिल 2018 पासून AePDS ही सुविधा राबविण्यात येत आहे. रास्त भाव दुकानातून ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने अन्नधान्य वितरण करण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!

Signup to receive latest news in your inbox!

Send this to a friend